गडचिराेली : राज्य शासनाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा‘ या अभिनव उपक्रमात शहरातील गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च महाविद्यालय हे नागपूर विभागातून अव्वल स्थानी आलेले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात सदर शाळा राज्यस्तरावर झेप घेतली असून राज्य शिक्षण संचालकांच्या चमुने साेमवारी या शाळेत दाखल हाेत दिवसभर या शाळेची पाहणी करून मुल्यांकन केले.
सदर उपक्रमाला जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झाली होती यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ९० टक्के शाळांनी सहभाग नोंदविला होता. त्यात टप्या-टप्या नुसार विशेष अधिकारी वर्गांकडून विविध मुद्यांवर शाळेचे मूल्यांकन करून गुणदान करण्यात आले होते.
यामध्ये केंद्र, तालुका, जिल्हा व विभाग या सर्व स्तरावर गोंडवाना सैनिकी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला आणि राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. विभागावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्यानंतर २६ फेब्रुवारी राेजी राज्य मूल्यांकन समिती गोंडवाना सैनिकी विद्यालयात दाखल झाली. या समितीमध्ये राज्य शिक्षण संचालक शरद गोसावी, हिंगाेलीचे शिक्षणाधिकारी सोनटक्के, शिक्षणाधिकारी फुले यांचा समावेश हाेता. मूल्यांकन समितीने संपूर्ण मुद्याला धरून विशेष तपासणी केली.
सदर उपक्रमात शाळा अव्वल आल्याबदल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरीचे सचिव तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम, अध्यक्षा भाग्यश्री आत्राम (हलगेकर), मार्गदर्शक ऋतुराज हलगेकर यांनी कौतुक केले आहे.
या मुद्यांच्या अनुषंगाने झाले मुल्यांकन
शाळेत व शालेय परीसर स्वच्छता, वर्ग सजावट व रंगरंगोटी, तंबाखू मुक्त शाळा घोषित करणे, विद्यार्थी पुरक आहार, चित्रकला स्पर्धा आयाेजन,जलजीवन मिशनचा शाळेत पाणी पुरवठा, वृक्ष लागवड केली आहे, त्याची योग्य ती जोपासना केली जाते,झाडाना पाणी येते का, याबाबीची पाहणी करण्यात आली. बालवाचनालय, बालवाचन नवोपक्रम, पेपरमध्ये लेख, बातम्या, संग्रही फाईल्स, विविध सामाजिक कार्यक्रम तसेच विविध थोर नेत्यांच्या जंयती,पुण्यतिथी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आदीं या मुद्यांच्या अनुषंगाने मुल्यांकन करण्यात
विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा तपासला
‘माझी शाळा सुंदर शाळा‘ या उपक्रमात नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गोंडवाना सैनिकी विद्यालयाला अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय चमुने साेमवारला भेट दिली. दिवसभर प्रत्येक बाबीचे बारकाईने मुल्यांकन केले. विशेष म्हणजे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्वता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेतली. शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जाही यावेळी तपासला.