गडचिरोली: अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गशिक्षकानेच अत्याचार केला. १९ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. पतीची संशयास्पद वागणूक पाहून पत्नीने गुपचूप मोबाइल तपासला, तेव्हा भंडाफोड झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून शिक्षकास अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, विश्वजित मिस्त्री (३८,रा. कालीनगर, ह.मु. विवेकानंदपूर ता. मुलचेरा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी मुलचेरा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. विश्वजित मिस्त्री हा तिचा वर्गशिक्षक आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले.
दरम्यान, पतीचे वागणे संशयास्पद वाटल्याने पत्नीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले, तसेच मोबाइल तपासला तेव्हा या मुलीसोबतची चॅटींग उघडकीस आली. यानंतर तिने पतीला जाब विचारला असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरुन शिक्षक विश्वजित मिस्त्रीविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी लागलीच त्यास ताब्यात घेतले. पो.नि. अशोक भापकर हे अधिक तपास करत आहेत.