गडचिरोली : येथील एका सहायक अभियंत्याला ”कॉलगर्ल”च्या माध्यमातून ”हानीट्रॅप”मध्ये अडकवून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या चार आराेपींना पाेलिसांनी साेमवारी अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ५ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. एक महिला आराेपी फरार असून, तिचा शाेध पाेलिस घेत आहेत.
सुशील गवई, रविकांत कांबळे, रोहित अहिर, ईशानी (सर्व रा. नागपूर) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. गडचिरोली येथील एक सहायक अभियंता कार्यरत आहेत. दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात एका कॉल गर्लसोबत हे अभियंता एका हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेलमध्ये दोघांनी सोबत वेळ घालवला. त्यामुळे त्यांची चांगली ओळख झाली.
दरम्यान, या कॉल गर्लने नंतर ही माहिती तिच्या ओळखीचा कथित पत्रकार रविकांत कांबळे यास दिली. त्याने अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली, तर पोलिस अंमलदार सुशील गवई हादेखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही हे प्रकरण मिटविण्यासाठी अभियंत्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली. मागील महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त अभियंत्याने रविवारी गडचिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली. पाेलिसांनी सापळा रुचून आराेपींना अटक केली. पीसीआर दरम्यान त्यांच्याकडून अधिकची माहिती काढण्याचा प्रयत्न पाेलिस करीत आहेत.