गडचिरोली: शहरापासून सात किलोमीटरवरील वाकडी येथील जंगल क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना ३ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घडली. दरम्यान, लेकीच्या डोळ्यादेखत आईवर वाघाने झडप घातली. यानंतर आई जोरात किंचाळली. मात्र, वाघ तिला ठार करुनच थांबला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५, रा. वाकडी ता.गडचिरोली) असे मयत महिलेचे नाव आहे. ती आपली कन्या शीतल तीक्षण रोहनकर व अन्य काही महिलांसोबत गावापासून अर्धा किलोमीटरवरील जंगलातील कक्ष क्र. १७१ मध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. तेथे दाट झुडूपात वाघ दडून बसल्याची तिला खबर नव्हती. सरपण गोळा करण्यात माय-लेकी व्यग्र असतानाच वाघाने मंगलाबाई यांच्यावर पाठीमागून हल्ला चढविला. यानंतर त्या जोराने ओरडल्या. कन्या शीतल व इतर महिलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा मंगलाबाई या वाघाशी झुंज देताना आढळल्या. मात्र, वाघाने त्यांच्या गळ्यावर पंजाने हल्ला केला. रक्तस्त्राव होऊन त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यानंतर कन्या शीतलसह इतर महिला आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. महिलांनी गावात येऊन माहिती दिल्यावर गावकऱ्यांनी धाव घेतली. गडचिरोली वनविभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
बोधलीतही केला होता हल्ला
गडचिरोली वनपरिक्षेत्रातील बोधली गावात ३० डिसेंबरला मंदाबाई कोठारे यांच्यावर वाघाने हल्ला केला होता. यावेळी इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. त्यामुळे मंदाबाई थोडक्यात वाचल्या होत्या. याच जंगल परिक्षेत्रातील वाकडी येथे ३ जानेवारीला वाघाने मंगलाबाई बोळे यांचा वाघाने बळी घेतला. त्यामुळे या भागात मोठी दहशत पसरली आहे.गतवर्षी वाघाने घेतले सहा बळी
मावळत्या वर्षात वाघाने जिल्हाभरात सहा जणांचा बळी घेेतला होता. देसाईगंज तालुक्यातील फरी, आरमोरी तालुक्यातील रामाळा, कुरखेडा तालुक्यातील ढुसी, गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, भगवानपूर, गोविंदपूर येथे प्रत्येकी एकाचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. नव्या वर्षातही हल्ल्याचे सत्र सुरुच असल्याने मानव व वन्यजीव संघर्ष तीव्रच असल्याचे चित्र आहे