मुनगंटीवारांवर पक्षाकडून जबाबदारी; लवकरच प्रचाराचा मुहूर्त
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील प्रचारासाठी ‘स्टार’ नेत्यांची घोषणा केली आहे. या यादीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार या ‘स्टार’ नेतृत्वाचाही समावेश आहे. आता लवकरच राज्यभरात प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला मुल येथे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हजारो कार्यकर्ते व चाहते यावेळी उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. विकासकामांचा धडाका गेल्या दहा वर्षांत त्यांनी लावला. पण ते एका जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण राज्यात लोकप्रिय आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील स्टार प्रचारकांच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे.
मुनगंटीवार आपल्या मतदारसंघात तर प्रचाराचे नारळ फोडतीलच. शिवाय राज्यभरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचीही जबाबदारी त्यांच्यावर असेल. विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. भाजपच्या वतीने प्रचाराचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. कोणत्या दिवशी कोणता नेता कुठल्या उमेदवारासाठी सभा घेईल, याचेही नियोजन झालेले आहे. दिवाळीनंतर रॅली आणि प्रचारसभांना सुरुवात होईल, असे कळते.
सुधीर मुनगंटीवार यांनी महायुती सरकारच्या दमदार कामगिरीत मोठं योगदान दिलं आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 350 वे वर्ष साजरे करणे, ब्रिटनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणणे, अगदी आग्र्याच्या दिवाण-ए-खासमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे यासारख्या अनेक कामांची दखल महाराष्ट्राने घेतली आहेत. याशिवाय मत्स्यव्यवसायाला प्राधान्य देणे, वन विभागातील विविध उपक्रम देखील त्यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले. ताडोबासह पेंच, कऱ्हांडला, बोर आदींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पाऊल टाकले. एकूणच राज्यात बहुआयामी नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात प्रचार
भाजपने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांची नावे आहेत.