फसलेले ट्रॅक्टर चालकाच्याच अंगावर उलटले; चिखलात दबून मृत्यू , ठाणेगावातील घटना

गडचिरोली जिल्हा
Unique Multiservice
Share

गडचिराेली : शेतात कापणी केलेल्या तुरी घरी आणण्यासाठी जात असताना बांध्यांमध्ये ट्रॅक्टर फसले. चिखलातून ते बाहेर काढताना ट्रॅक्टर उलटले. चारही चाके वर झाल्याने यात दबून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आरमाेरी तालुक्याच्या ठाणेगाव येथील शेतशिवारात शुक्रवार २ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजता घडली.

सुरेश दुधराम लट्ठे (५०) रा. ठाणेगाव असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. सुरेश लट्ठे हे राेजंदारीने ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत हाेते. शुक्रवारी ते ठाणेगाव येथील मंगेश जुवारे यांच्या सासऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चालविण्यासाठी व ऋषी नैताम यांच्या शेतातील तुरी आणण्यासाठी गेले असता ट्रॅक्टर व ट्राॅली चिखलात फसली. दुसऱ्या ट्रॅक्टरमुळे कशीतरी ट्राॅली निघाली.

 

परंतु इंजिन फसले. सदर राेवणी हंगाम सुरू असल्याने चाकांना आधीच कॅजव्हील लावले हाेते. कॅजव्हीलमध्ये लाकडी फाटे टाकून ती बाहेर काढत असतानाच नियंत्रण सुटले व दुर्दैवाने सुरेश लठ्ठे हे त्यात दबले. अन्य सहकारी असतानाही लठ्ठे यांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. लठ्ठे हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदहे विच्छेदनासाठी पाठविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत