गडचिरोली सिरोंचा तालुक्यातील बहुप्रतीक्षित पेंटीपाका आणि टेकडा उपसा सिंचन योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. मात्र, या भागात एकही सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे शेती सिंचनाखाली येत नव्हती. धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती होती. तालुक्यातील पेंटीपाका व रेगुंठा सारख्या भागात उपसा सिंचन योजना आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती
या उपसा सिंचन योजनेमुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमधील जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागेल तसेच विहिरींच्या भूजल पातळीत वाढ होईल. परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका आणि टेकडा परिसरातील अनेक गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. पेंटींपाका व टेकडा उपसा सिंचन योजनेला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत नद्यांतील पाणी उपसून ते सिंचनासाठी वापरले जाणार आहे. योजनेमुळे सिंचनक्षेत्र वाढेल. सिरोंचातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. – धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन